कोरोना लसीसंदर्भातील माहिती चोरी करण्यासाठी या देशांमध्ये ‘सायबर वॉर’


जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचे काम अनेक देश करत आहेत. सर्वाधिक आघाडीवर अमेरिका, चीन, रशिया आणि भारत आहे. मात्र लवकरात लवकर लस आपल्या नागरिकांसाठी उपलब्ध करता यावी म्हणून लसीसंबंधीत संशोधन चोरी करण्याची देखील एकीकडे प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेच्या कोरोना व्हायरस लसीसंबंधित संशोधन चोरी करण्यासाठी चीन, रशिया आणि इराणने आपल्या गुप्तचर विभागाना कामाला लावले आहे.

चीनच्या गुप्तचर विभागाच्या हॅकर्सने यूनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना आणि अन्य अमेरिकन संस्थेच्या लसीचे संशोधन डेटा चोरी करण्याचा प्रयत्न केला. हॅकर्स यूनिव्हर्सिटीच्या सिस्टमला निशाणा बनवत आहेत. कारण औषध कंपन्यांच्या तुलनेत यांच्या डेटा सिस्टमची सुरक्षा कमकुवत आहे.  अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, चीन, रशिया आणि इराणच्या हॅकर्सने अमेरिकेच्या बायोटेक कंपन्यांच्या सिस्टमवर देखील हल्ला केला.

अमेरिका आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनुसार, रशियाची गुप्तचर संस्था एसव्हीआरच्या गुप्तहेरांनी अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या यूनिव्हर्सिटी आणि अन्य संस्थांमधून लसीच्या संशोधनासंदर्भातील माहिती चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देखरेख करणाऱ्या सिस्टमने पकडले.

ज्या अमेरिकन कंपन्यांवर सायबर हल्ले झाले त्यात गिलीड सायसन्सेज, नोवाव्हॅक्स, मॉडर्नाचा समावेश आहे. मात्र अद्याप कोणत्याही कंपनीने डेटा चोरी झाल्याची पुष्टी केलेली नाही. आतापर्यंत हॅकर्सच्या दोन टीमला अधिकाऱ्यांनी पकडले आहे. इराण देखील लसीसंदर्भातील माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.