जीडीपी घसरण्यामागचे मोठे कारण ‘गब्बर सिंह टॅक्स’, राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी घसरलेल्या जीडीपीवरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. जीडीपीमध्ये ऐतिहासिक घट होण्याचे कारण मोदी सरकारचा गब्बर सिंह टॅक्स (जीएसटी) असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेवरील तिसरी व्हिडीओ शेअर केला असून, यात जीएसटी गरीब लोकांवर, छोटे दुकानदार, लघुउद्योग, शेतकरी आणि कामगारांवर आक्रमण असल्याचे म्हटले आहे.

घसरलेल्या जीडीपी दरावरून सरकारवर टीका करत राहुल गांधींनी ट्विट केले की, जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण होण्यामागचे मोठे कारण मोदी सरकारचा गब्बर सिंह टॅक्स (जीएसटी) आहे. यामुळे खूप काही उध्वस्त झाले – लाखो छोटे व्यापारी, कोट्यावधी नोकरी आणि युवकांचे भविष्य, राज्यांची आर्थिक स्थिती. जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश.

व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, जीएसटी यूपीएची आयडिया होती. एक कर, कमीत कमी कर आणि सरळ कर. एनडीएचा जीएसटी एकदम वेगळा आहे. चार वेगवेगळे कर, 28 टक्क्यांपर्यंत कर आणि समजण्यास अवघड. जे लघु व मध्यम उद्योग आहेत ते हा कर भरूच शकत नाहीत. मात्र ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या हा कर सहज भरू शकतात. मात्र यासाटी 5, 10 किंवा 15 अकाउंटेंट्स लागतील.