कोरोना : देशात एका दिवसात आढळले सर्वाधिक 90,632 रुग्ण, ब्राझीलला टाकले मागे

कोरोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 90 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात एकूण 90,632 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. यासोबतच भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 लाखांच्या पुढे गेला आहे.

मागील 24 तासात 1065 रुग्णांच्या मृत्यूसह आतापर्यंत एकूण 70626 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 73,642 रुग्ण बरे झाले असून, हा बरे होण्याचा देखील एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे. देशात 31 लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर 8,62,320 एक्टिव्ह रुग्ण आहे. जे हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये आहेत.

बरे होण्याचा दर 77.32 टक्क्यांवर पोहचला असून, मृत्यू दर 1.71 टक्के आहे.  कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 40 लाख 90 हजार आहे. तर भारताने 41 लाखांचा आकडा पार केला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, तेथील कोरोना रुग्णांची संख्या 62 लाखांच्या पुढे गेली आहे.