खुशखबर! देशी कोरोना लस ‘कोवॅक्सिन’ क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज 80 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. अनेक देशांमध्ये या आजारावरील लस शोधण्याचे काम सुरू असून, भारतात देखील काही लसींवर काम सुरू आहे. यातच आता भारत बायोटेक कंपनीनेद्वारे तयार केल्या जात असलेल्या कोवॅक्सिन कोरोना लसीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पुर्ण झाला आहे. आता कंपनीने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे.

भारत बायोटेकने दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी पत्र लिहिले आहे. या पत्राला उत्तर देताना डीसीजीआयच्या डॉक्टर एस एश्वर्या रेड्डीने 380 लोकांवर ट्रायल करण्याचा सल्ला दिला आहे.

भारत बायोटेकने पहिल्या टप्प्यात 12 शहरांमध्ये ट्रायल केले. पहिल्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 375 लोकांनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या टप्प्यातील मानवी ट्रायल देखील लवकरच काही आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी जायडस कॅडिला हेल्थ केअर लिमिटेड आणि पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटने आधीच क्लिनिकल ट्रायल सुरू केलेले आहे.