… आणि केवळ एका युवतीसाठी धावली राजधानी एक्सप्रेस

एका युवतीच्या हट्टासमोर रेल्वेला देखील हार मानावी लागली असून, एका प्रवाशासाठी राजधानी एक्सप्रेस चालवावी लागल्याची घटना समोर आली आहे. जाणार तर राजधानी एक्सप्रेसनेच असा हट्टच या युवतीने पकडला होता. बसने जायचे असते तर रेल्वेचे तिकिट का काढले असते ?  तिकिट राजधानी एक्सप्रेसचे काढले असल्याने यानेच जाणार असा हट्ट मुलीने केल्याने अखेर राजधानी एक्सप्रेस चालवावी लागली व युवतीला 535 किमी प्रवासानंतर रांची येथे पोहचवले.

सध्या झारखंडच्या लातेहारमध्ये टाना भगतांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सर्व रेल्वे डालटनगंज स्टेशनवरच अडकल्या होत्या.  रेल्वेने 929 प्रवाशांची बसने जायची देखील सोय केली. मात्र अनन्या नावाच्या युवतीने घरी जायचे असेल तर रेल्वेनेच जाणार असल्याचा हट्ट केला.

युवतीच्या या हट्टापायी रेल्वेला देखील हार मानावी लागली व एकट्या प्रवाशासाठी 535 किमीचा प्रवास करावा लागला. अखेर रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी राजधानी एक्सप्रेस रांचीला पोहचली. अधिकाऱ्यांनी सांगितले की युवतीला खूप समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने ऐकले नाही. अखेर राजधानी एक्सप्रेस डालटनगंजववरून पुन्हा फिरून गोमो आणि बोकारो या मार्गाने रांचीला रवाना झाली.

कदाचित रेल्वेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले असावे की एका प्रवाशाला सोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेसने 535 किमी अंतर पार केले.