खरी माणुसकी! सीमेवर तणाव असतानाही भारतीय जवानांनी वाचवले चीनी नागरिकांचे प्राण

भारत-चीनमध्ये सीमेवर तणावाची स्थिती आहे. असे असले तरी देखील भारतीय सैन्याच्या जवानांनी मानवता आणि उदारतेचे उहाहरण समोर ठेवून उत्तर सिक्किममध्ये अडकलेल्या 3 चीनी नागरिकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. 3 सप्टेंबरला 17,500 फूट उंचीवर उत्तर सिक्किमच्या पठारी प्रदेशात 3 चीन नागरिक रस्ता भरकटले होते. शून्य डिग्रीपेक्षाही कमी तापमान असल्याने अधिक अडचणीत अडकले होते. अशा स्थिती भारतीय सैन्याचे जवान तेथे पोहचले व त्यांनी या नागरिकांचे प्राण वाचवले.

सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, चीनी नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर जवान त्वरित तेथे पोहचले. तीन चीनी नागरिक, यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष रस्ता भरकटल्यामुळे अडकले होते. भारतीय जवानांनी त्यांच्या मदतीसाठी त्यांना ऑक्सिजन, जेवण आणि गरम कपड्यांसह वैद्यकीय मदत उपलब्ध केली.

एवढेच नाहीतर आपल्या निश्चित ठिकाणी पोहचण्यासाठी भारतीय जवानांनी त्यांना रस्त्याची माहिती देखील दिली. यानंतर ते पुढे निघून गेले. चीनी नागरिकांनी या मदतीसाठी भारतीय जवानांचे आभार देखील मानले.