कोरोना टेस्टिंगबाबत आयसीएमआरने जारी केली नवीन गाईडलाईन

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना टेस्टिंगबाबत नवीन गाईडलाईन जारी केली आहे. नवीन गाईडलाईनमध्ये रॅपिड अँटिजन टेस्टच्या प्रोटोकॉलमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. आता या टेस्टमध्ये व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला पॉझिटिव्ह समजले जाईल. जर टेस्ट नेगेटिव्ह आली आणि काही लक्षणे असल्यास आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल.

नेगेटिव्ह आल्यानंतर व्यक्तीमध्ये लक्षणे दिसली नाहीत आणि पुढे जाऊन लक्षणे आढळल्यास पुन्हा व्यक्तीला या दोन्हींपैकी एक टेस्ट करावी लागेल. आयसीएमआरनुसार नॉन कंटेन्मेंट झोनमधील लक्षणे असलेले सर्व लोक आणि हॉस्पिटलमध्ये आधी प्राथमिकता आरटी-पीसीआर आणि नंतर रॅपिट अँटिजन टेस्टला दिली जाईल. तर  कुटुंब-कामावरील लोक, 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले, आधी काही आजार असलेल्यांसाठी प्रथम प्राथमिकता रॅपिड अँटिजन टेस्ट व नंतर आरटीपीसीआर केले जाईल.

श्वासासंबंधित गंभीर आजार, सर्व लक्षणे असलेले रुग्ण, लक्षण नसलेले उच्च धोका असलेले रुग्ण, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, ट्रांसप्लांट करणारे रुग्ण, आधी गंभीर आजार असणारे आणि 65 वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज आहे.

आयसीएमआरने देशात टेस्टिंग ऑन डिमांडला परवानगी दिली आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आता स्वतःहून टेस्टिंग करायची असल्यास करू शकते. आतापर्यंत केवळ लक्षणे असलेल्या व्यक्तींचीच आरटी-पीसीआर टेस्ट केली जात होती.