नीट-जेईई परीक्षा होणारच, 6 राज्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जेईई मेन आणि 13 सप्टेंबरला होणाऱ्या नीटच्या परीक्षेला हिरवा कंदील दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात याची विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती. मात्र आता न्यायालयाच्या निर्णयाने ठरलेल्या तारखेलाच जेईई आणि नीट परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याआधी 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात परीक्षा पुढे ढकलण्यास स्पष्ट नकार दिला होता. यानंतर केंद्र सरकारने देखील ठरलेल्या तारखेला परीक्षा पार पडतील असे म्हटले होते. याविरोधात 6 राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश बीआर गवई आणि जस्टिस कृष्ण मुरारी यांच्या पीठाने 6 राज्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांद्वारे दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली. याचिकाकर्त्त्यांमध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह 6 मंत्र्याचा समावेश होता.