CSK ला आणखी एक झटका, रैनानंतर आता या दिग्गज खेळाडूची आयपीएलमधून माघार

कोरोना संकटाचे यंदाच्या आयपीएलवर सावट आहे. अनेक वेळा आयोजन पुढे ढकलल्यानंतर अखेर बीसीसीआयने यंदाचा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ यूएईला देखील पोहचले आहेत. मात्र यानंतर चेन्नई सुपर किंग्सला एकामागोमाग एक झटके बसत आहे. रैना पाठोपाठ आता हरभजन सिंहने देखील आयपीएलमधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

यूएईला पोहचल्यानंतर सीएसकेच्या एका खेळाडूसह 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखील वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेत असल्याचे म्हटले होते. रैनाचे पुन्हा भारतात परतण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहे. फ्रेंचाईजी आणि रैनामध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर हरभजन सिंहने माघार घेतल्याने चेन्नईला मोठा झटका बसला आहे.

हरभजन इतर खेळाडूंपेक्षा उशीराच यूएईला पोहचला होता. आता खाजगी कारणामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. हे कारण काय आहे, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय सीएसके किंवा हरभजन सिंहने देखील याबाबत काहीही सांगितलेले नाही.