एलएसीवरील स्थिती गंभीर, मात्र आम्ही तयार – लष्करप्रमुख

मागील काही दिवसांपासून लडाखमध्ये एलएसीवर चीनसोबत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लष्करप्रमूख जनरल एम एम नरवणे यांनी लडाखचा दौरा केला. यानंतर माध्यमांशी बोलताना नरवणे म्हणाले की, एलएसीवरील स्थिती सध्या काहीशी गंभीर आहे. ज्यामुळे भारताची सुरक्षा आणि अखंडतेसाठी खबरदारी म्हणून सैन्य तैनात करण्यात आले आहे.

नरवणे म्हणाले की, एलएसीवरी स्थिती थोडी तणावाची आहे. अशा स्थिती सुरक्षेच्या दृष्टीने सैन्य तैनात करण्यात आलेले आहे. लडाख दौऱ्यावर लष्करप्रमुखांनी चुशूल सेक्टरला भेट दिली. येथून भारतीय सैन्य चीनी सैन्याच्या हालचालींवरून लक्ष ठेवू शकते. नरवणे यांनी लेहमध्ये XIV कॉर्प्सच्या मुख्यालयाला देखील भेट स्थितीचा आढावा घेतला.

नरवणे म्हणाले की, लेहला पोहचल्यानंतर मी विविध ठिकाणांना भेट दिली. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जवानांचे मनोबल उंचावलेले आहे आणि ते कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. मी सांगू इच्छितो की आपले अधिकारी हे जगात सर्वोत्तम आहे व ते केवळ लष्करालाच नाही तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील.

दरम्यान, चीन भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याने दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. तणाव कमी करण्यासाठी लष्करी व मुत्सद्दी पातळीवर चीनशी चर्चा सुरू असल्याचे लष्करप्रमुखांनी म्हटले होते.