गर्भवती पत्नीच्या परीक्षेसाठी पतीने चालवली हजारो किमी स्कूटर, दागिनेही ठेवले गहाण

एखादी गोष्ट जर तुम्ही पुर्ण करायची ठरवली तर तुम्हाला त्यात कोणीही अडवू शकत नाही. अडचणीत असाल तर काहीना काही मार्ग तुमच्यासमोर नक्कीच असतो. याचेच उदाहरण झारखंड येथील जोडप्याने समोर ठेवले आहे. येथील पतीने आपल्या गर्भवती पत्नीला परीक्षा केंद्र पोहचविण्यासाठी तब्बल 1300 किमी स्कूटर चालवल्याची घटना समोर आली आहे.

दशरथ आणि सोनी मांझी हे झारखंडच्या गंटातोला गावात राहतात. 7 महिन्यांच्या आपल्या गर्भवती पत्नीला परीक्षा देता यावी यासाठी दशरथ यांनी 28 ऑगस्टला आपला प्रवास सुरू केला व ते 30 ऑगस्टला हजारो किमी अंतर पार करून मध्य प्रदेशच्या ग्वालियरला पोहचले. सोनी यांना डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा द्यायची होती. प्रवासासाठी त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते. अखेर दागिने गहाण ठेवावे लागले. दोघेही केवळ एक रेनकोटसोबत घेऊन या प्रवासाला निघाले.

दशरथ यांचे वय 37 वर्ष असून, ते एका कंपनीत केटरिंगचे काम करतात. दशरथ याविषयी म्हणाले की, सोनीने आपले स्वप्न पुर्ण करावे व चांगले करिअर करावे. शिक्षण पुर्ण केल्यानंतर शाळेत शिक्षक बनेल. यामुळे दोन महिन्यानंतर आमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीच्या भविष्यात आम्ही बदल घडवू शकू. रेल्वे बंद आहेत आणि टॅक्सी 25-30 हजार रुपये भाडे मागतात. एवढे भाडे देऊ शकत नसल्याने आम्ही स्कूटरवरून ग्वालियरला परीक्षेसाठी येण्याचा निर्णय घेतला.

दशरथ यांच्यानुसार, त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आले आहेत. मध्य प्रदेश सरकारने त्यांना झारखंडला परतण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारे दोघांचे दिल्लीपर्यंत विमानाचे तिकिट काढले आहे व तेथून पुढे झारखंडला जाण्यासाठी देखील मदत केली जाईल. त्यांची स्कूटर रेल्वे पार्सलद्वारे पाठवली जाणार आहे.

दशरथ यांचे मासिक उत्पन्न 9 हजार रुपये आहे. त्याने सोने देखील गहाण ठेवले. या प्रवासासाठी त्यांना पेट्रोलसाठी 2 हजार रुपये खर्च आला. प्रवासात त्यांनी एका बागेत रात्र काढली. सोनी यांनी आणखी 7 दिवस परीक्षा द्यायची आहे. यासाठी त्यांनी 1500 रुपये देऊन भाड्याने एक रुम देखील घेतली आहे. या जोडप्याची माहिती मिळाल्यानंतर ग्वालियरचे जिल्हा प्रशासन देखील मदतीसाठी पुढे आले आहे.