विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशन 7 तारखेपासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच चिंतेची बाब म्हणजे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः नाना पटोलेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन केले आहे.

नाना पटोले यांनी ट्विट करत माहिती दिली की, गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये.

गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबरला होणार आहे. त्याआधीच विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने आता सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे.