उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका जागेवरून ठेवतात यंत्रणेवर लक्ष : संजय राऊत


मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेरच पडत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, संपूर्ण मंत्रिमंडळ राज्यभर फिरत आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत एक सारखीच असून एका जागेवरून थांबून ते यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत, ते पाळले जात असल्याचे राऊत म्हणाले.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे हा त्यांचा अधिकार असून कामाची व्याप्ती एका जागेवर बसून वाढवून काम करण्याची डिजिटल इंडियाची संकल्पना नरेंद्र मोदींचीच असल्याचे संजय राऊत म्हणाले. मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना यावेळी राऊत म्हणाले की, जनतेचे हित लक्षात घेऊन सरकारने मंदिरांबाबत निर्णय घेतला आहे. सरकारला मंदिरे बंद करण्याची आम्हाला देखील हौस नाही. फक्त राजकारणासाठी विरोध करू नये, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. पंढरपूरला आंबेडकरांच्या आंदोलनात नियमांचा फज्जा उडाला. या सर्वांनी थोडा संयम बाळगायला हवा, महाराष्ट्राचे अहित होणार नाही, याचे भान ठेवले पाहिजे. केंद्र सरकारप्रमाणे कोरोनाला महाराष्ट्र सरकार ‘ऍक्ट ऑफ गॉड’ मानायला तयार नसल्याचे राऊत म्हणाले.

राऊत राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलताना म्हणाले की, सरकार बदलले की बदल्या करायच्या नाही, असे संविधानात लिहिले आहे का? यापूर्वीच्या किंवा केंद्राच्या सरकारमध्ये बदल्या झाल्या नव्हत्या का? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या संदर्भात त्यांच्या कुटुबांची जबाबदारी घेण्यासंदर्भात बोलणार आहे. पुण्यात अँब्युलन्स मिळू नये, हे दुर्देवी असल्याचे राऊत म्हणाले.