‘आदिपुरुष’मध्ये रावणाची भूमिका साकारणार सैफ अली खान


पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता सैफ अली खान सज्ज झाला असून सैफ दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याची मुख्य भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात खलनायकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सैफ रावणाची भूमिका ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात साकाणार आहे.

यापूर्वी सैफने ओम राऊतच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात उदयभान राठोडची खलनायिका भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘आदिपुरुष’मध्येदेखील तो आता खलनायकाच्या रुपात पाहायला मिळणार आहे. मी ओम राऊतसोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक असून चित्रपटाविषयी एक चांगला दृष्टीकोन आणि टेक्निकल ज्ञान त्यांच्याकडे आहे. तसेच प्रभाससोबत तलवारबाजी करण्यास आणि ही खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे सैफने एका मुलाखतीत सांगितले.

ओम राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांनी या पोस्टरमध्ये यावेळी Celebrating Victory of Good over Evil असे लिहिले होते. याचाच अर्थ वाईट गोष्टींवर चांगल्याची मात असा होता. तसेच श्रीरामाचे धनुष्यबाण या पोस्टरमध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे हनुमान आणि रावण दिसत असल्यामुळे हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून याची निर्मिती भूषण कुमार करत आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.