आजपासून या नियमांनुसार पुण्यात धावली PMPML


पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी, गणेशोत्सवानंतर म्हणजेच (३ सप्टेंबर) आजपासून पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यात आली आहे. पण पहिल्या टप्प्यात नव्या नियमांनुसार फक्त २५ टक्केच बसेस १९० मार्गांवर धावणार आहेत.

१ जूनपासून राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत शहरात नागरिकांची वर्दळ वाढली. पण ज्यांच्याकडे खाजगी वाहने नाहीत अशा नागरिकांची गैरसोय होत असल्याने, बससेवा सुरू करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात ऑगस्ट महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशोत्सवामध्येच बससेवा सुरू करण्याबाबत काहींनी मागणी करण्यात आली होती. पण त्यावेळी गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळावी याकरिता ३ सप्टेंबरपासूनच बससेवा सुरू करावी अशी भूमिका प्रशासनाने मांडली होती.

त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पीएमपीएमएलची वाहतूक सेवा आजपासून सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीकडील १३ आगारांकडून १९० मार्गांवर ४२१ गाड्यांचे संचलन होणार आहे. पण त्यासाठी नियमांचे काही पालन करावे लागणार आहे.

  • १७ प्रवाशांनाच मिनी बसमध्ये परवानगी
  • सीएनजी मोठ्या बसमध्ये १७ प्रवाशांना बसण्याची आणि तिघांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी
  • ही सेवा सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी सुरु असणार
  • गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या स्थानकांवरुन २४ मार्गांवर १२० जादा शटल बस गाड्यांचे नियोजन
  • केवळ २२ प्रवाशांनाच एकावेळी बसमधून प्रवास करण्याची मुभा
  • बसमधून दहा वर्षांखालील लहान मुले आणि ६५ वर्षापुढील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नाही
  • सुरक्षितता नियमांचे पालन करण्यासाठी आसनांवर खुणा
  • बसच्या प्रत्येक फेरीनंतर पीपीई किट घालून बसचे सॅनिटायझेशन
  • ड्रायव्हरची केबिन प्लास्टिकने बंद करण्यात आली असून कंडक्टरला फेस मास्क
  • दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी रविवार वगळता सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत स्वारगेट, महात्मा गांधी स्थानक, हडपसर, डेक्कन जिमखाना, पुणे रेल्वे स्थानक, पुणे मनपा, विश्रांतवाडी, वाघोली, कात्रज, वारजे, माळवाडी, निगडी, चिंचवडगाव, पिंपळे गुरव, भोसरी, सांगवी आणि पिंपरी चौक अशी १६ पासकेंद्रे सुरु कऱण्यात आली आहे.

Loading RSS Feed