पांडुरंग रायकर मृत्युप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – एकनाथ खडसे


मुंबई – कोरोनाच्या रूग्णांसाठी कोट्यावधी रूपये खर्च करून, मोठा गाजा-वाजा करीत उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा काल उघड झाला. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा अ‍ॅम्ब्युलन्सची अनुप्लब्धता, व्हेंटिलेटर-ऑक्सिजन खाटांच्या नियोजनातील ढिसाळपणा आणि मुर्दाड यंत्रणेचा फटका बसल्याने हकनाक बळी गेला. राज्य सरकार आणि प्रशासकीय कारभाराचे रायकर यांच्या निधनानंतर धिंदवडे निघाले आहेत. त्यामुळे, याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

सरकारवर टीका करत, शासनाच्या असुविधेचा हा बळी असल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे आणि अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. तसेच, प्रशासन व्यवस्थेतील ज्यांनी ज्यांनी हलर्गीजपणा केला, त्या हलगर्जीपणाचा हा बळी असल्यामुळे, ज्यांनी कोणी हा हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
3 जून रोजी कोरोना वॉरियर्स म्हणून राज्य सरकारने पत्रकारांना 50 लाख रुपयांचा विमा सुरक्षा कवच देण्याची घोषणा केली होती. पण पत्रकारांसदर्भातील जीआर अद्यापही काढण्यात न आल्यामुळे, रायकर यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करुन दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पुण्यात पत्रकारिते निमित्ताने स्थायिक झाले होते. पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. ३१ ऑगस्टला रात्री सीईओपीच्या मैदानावरील कोविड-१९ जम्बो हॉस्पिटलमध्ये रायकर यांना दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांनी इतर पत्रकारांना केलेले मेसेज हे अतिशय धक्कादायक होते. मंगळवारी रात्री दीड वाजता मला खूप वाईट वाटत आह, मला जेवायला द्या, औषध द्या, असे संदेश त्यांनी आपल्या सहकारी पत्रकारांना पाठवले होते.

त्यांची स्थिती खूपच खालावल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक सरकारी अधिकारी-पदाधिकाऱ्यांना त्यावेळी फोन केल्यानंतरही एक कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. हा बळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि असंवेदनशिलतेचा आहे, असा आरोप पुणे श्रमिक पत्रकार संघाने केला आहे.

काही कमतरता पांडुरंग रायकर यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये होती किंवा कसे याकरिता चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना विनंती करण्यात आल्याचे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की जम्बो हॉस्पिटल सज्ज नसतानाही त्याचे उद्घाटन करण्यात आले. यंत्रणेअभावी रायकर यांचा मृत्यू झाला.