या पठ्ठ्याने चक्क युट्यूबच्या मदतीने शोधली चोरीला गेलेली कार, पण नक्की कशी…

दिल्लीतील एका उद्योगपतीने आपल्या चोरी झालेल्या एसयूव्हीला चक्क युट्यूब चॅनेलच्यी मदतीने 3 दिवसात शोधले आहे. उद्योगपतीने दिलेल्या माहितीच्या आधारावर अखेर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून गाडी ताब्यात घेतली. व्यापारी संजय चढ्ढा हे आपल्या कुटुंबासोबत राणा प्रताप बाग या भागात राहतात. पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी फॉर्च्यूनर भेट दिली होती. मात्र अचानक एका रात्री गाडी चोरीला गेली. संजय यांनी या घटनेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये देखील दिली.

पोलिसात तक्रार केल्यानंतर देखील संजय स्वतः गाडीचा शोध घेत राहिले. पोलिसांसोबत त्यांनी देखील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यांनी व्हिडीओ फुटेजमधील माहिती नोंद करत याबाबत पोलिसांनी माहिती दिली. त्यांना समजले की चोरी केलेल्या गाड्यांना काहीदिवस पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये लपवले जाते. त्यानंतर पुढे या गाड्यांना पाठवले जाते.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, चोरी केलेल्या गाड्यांना लपविण्यासाठी गाझियाबाद, संभल, मुजफ्फरनगर आणि बागपत सारख्या भागांचा वापर केला जातो. यानंतर संजय यांनी या भागातील प्रसिद्ध युट्यूब चॅनेलचा शोध घेतला. या चॅनेल्सवर आपल्या गाडीबाबत माहिती शेअर केली. त्यांनी युट्यूबवरील न्यूज चॅनेलची यादीच तयार केली. यानंतर न्यूज चॅनेलच्या संचालकांशी संपर्क केला. गाडीची माहिती देणाऱ्याला 30 हजार रुपयांचे इनाम देखील त्यांनी जाहीर केले.

त्यांनी चॅनेलवर गाडीचा फोटो आणि आवश्यक ती माहिती शेअर केली. युट्यूब व्हिडीओ पाहून एका व्यक्तीने मुजफ्फरनगरमध्ये चोरी झालेली टोयोटा फॉर्च्यूनर पाहिली व संजय यांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचत गाडी ताब्यात घेतली.