वैज्ञानिकांचा दावा; कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवू शकते हे स्वस्त औषध

जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभराचील कोरोना रुग्णांची संख्या अडीच कोटींच्या पुढे गेली आहे. या आजारावरील लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र लस येईपर्यंत औषधांद्वारेच रुग्णांचे प्राण वाचवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, स्वस्त स्टेरॉयड औषध गंभीर कोरोना रुग्णांचे प्राण वाचवू शकते. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने देखील नवीन सूचना जारी केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, स्टेरॉयड औषधांचा उपयोग केवळ गंभीर स्थितीमध्ये असलेल्या कोरोना संक्रमित व्यक्तीवर केला जाईल. सुरुवातीची हलकी लक्षणे असलेल्या रुग्णांवर याचा उपयोग केला जाणार नाही. जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे प्रमूख संपादक हावर्ड सी बाउचर यांनी देखील हाच दावा केला आहे. डब्ल्यूएचओनुसार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 1700 कोरोना रुग्णांवर स्टेरॉयड औषधाचे तीन प्रकारचे ट्रायल करण्यात आले आहेत. यात आढळले की या औषधांमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी झाला.

डेक्सामेथासोन, हायड्रोकार्टिसोन आणि मिथाइलप्रेडिसोलोन सारखे स्टेरॉयड औषध रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, सूज आणि वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. स्टेरॉयड एक प्रकारचा रासायनिक पदार्थ आहे. जो व्यक्तीच्या शरीराच्या आतच तयार होतो. स्टेरॉयडला मांसपेशीच्या विकासासाठी उपयोगी मानले जाते. तुम्ही अनेकदा खेळाडूंना याचा वापर करताना ऐकले असेल, मात्र स्पर्धेदरम्यान याचा उपयोग करण्यास बंदी आहे.

दीर्घकाळ स्टेरॉयडचा उपयोग केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याच्या उपयोगामुळे लोकांन खोकला-सर्दी सारखे आजार होतात. कधीकधी हा आजार जीवघेणा देखील ठरू शकतो. त्यामुळे याच्या उपयोगाच्या आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.