मालिकांच्या आणि रिअॅलिटी शोच्या सेटवर आढळू लागले कोरोनाबाधित


मुंबई : हो नाही हो करत अखेर मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली. पण अखेर ज्याची भिती होती, तेच घडले आहे. मालिकांच्या सेटवरदेखील कोरोनाची दुष्ट नजर पडली आहे. कारण हिंदी मालिकांच्या आणि रिअॅलिटी शोच्या सेटवरही कोरोनाबाधित आढळू लागले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर सध्या दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानतंर आता इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरील सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट गेल्या काही दिवसांपासून अधिकच वाढत आहे. त्यातच नियम अटींसह मालिका आणि चित्रपटाच्या चित्रिकरणाला परवानगी देण्यात आलेली असली तरी त्यामुळे धोका वाढतच असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये कौन बनेगा करोडपतीचा सेट उभारण्यात आला आहे. तेथील दोन क्रू मेंम्बर्सना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण सेट तातडीने सॅनिटाईज करण्यात आला आहे. या दोघांना क्वारंटाईन कऱण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आणखी कोण कोण आले आहेत याचा शोध सुरू आहे.

त्याचबरोबर कोरोनाने मलाईका अरोरा, गीता कपूर, टेरेंस लुईस यांच्या इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरही शिरकाव केला आहे. या शोच्या सेटवरील सात लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या शोमध्ये अनेक डान्सर सहभागी असल्यामुळे या सेटवर जरा चिंतेचे वातावरण आहे. त्याचबरोबर स्वराज्यजननी जिजामाता या मराठी मालिकेच्या सेटवरही दोन क्रूमेम्बर्सना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर कुणाला कोरोना झालेला नाही. तर सिंगिग स्टारच्या सेटवर कोरोना आल्यानंतर त्यांनी 10 तारखेपर्यंत चित्रिकरण थांबवले आहे. त्यानंतर पुन्हा हे चित्रिकरण सुरू होईल.