अ‍ॅप्सवर बंदी घातल्याने चीनचा तीळपापड, आठवले गुंतवणुकदारांचे हित

केंद्र सरकारने काल पुन्हा एकदा पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली. याआधी देखील सरकारने दोन टप्प्यात 106 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. मात्र अ‍ॅपवर बंदी घातल्याने चीन चांगलाच बिथरला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अ‍ॅप बंदीबाबत म्हटले आहे की, मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी चीनी गुंतवणुकदार आणि सेवा प्रदान करणाऱ्यांच्या कायदेशीर हिताचे उल्लंघन आहे.

चीन याबाबत गंभीररित्या चिंतित असून, याचा विरोध करतो, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत भारताने काल 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. चीनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची ही सरकारची तिसरी वेळ आहे.

याआधी सरकारने जूनमध्ये टीक-टॉकसह 47 आणि जूलैमध्ये 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातलेल्या अॅप्सला देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व, एकतेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.