सुरक्षा परिषदेत चीन-पाकला जोरदार धक्का; भारताच्या मदतीसाठी एकवटले पाच देश


संयुक्‍त राष्‍ट्र: संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिकांना चीनच्या मदतीने दहशतवादी घोषित करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने पाकिस्तान आणि चीनची नापाक खेळी उधळून लावली आहे. या पाचही देशांनी भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

चीनच्या मदतीने याआधीही पाकिस्तानने भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचे चीनच्या मदतीने अंगरा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. पण या दोघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्यामुळे त्यांना दहशतवादी घोषित केले जाऊ नये, अशी भूमिका सुरक्षा परिषदेच्या तीन स्थायी आणि दोन अस्थायी सदस्यांनी घेतली. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला तसे आवाहन केले. पाकिस्तानने याआधीही वेनुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण तो अमेरिकेने उधळून लावला होता.

एकूण ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. अफगाणिस्तानातील विकास कामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर पाकिस्तान नजर ठेवून आहे. या नागरिकांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांशी जोडण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. पण सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पाकिस्तानचे चारही प्रस्ताव रोखल्यामुळे पाकिस्तान तोंडघशी पडला आहे.ॉ

अशा प्रकारे भारतीय नागरिकांविरोधात पुरेसे पुरावे देण्यात याआधीही पाकिस्तानला अपयश आले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. यानंतर पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्तींनी एक ट्विट करून निशाणा साधला. पाकिस्तानचा दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरक्षा परिषदेने हाणून पाडला. पाकिस्तानची नापाक खेळी रोखणाऱ्या देशांचे आम्ही आभारी असल्याचे त्रिमूर्तींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.