अमेरिकेपेक्षा वरचढ ठरला चीन; जगातील सर्वात मोठे नौदल चीनकडे


नवी दिल्ली – विस्तारवादी दृष्टीकोनातून आपली लष्करी ताकत सातत्याने चीन वाढवत असून चीनकडे सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठे नौदल आहे. चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विविध भागात या समुद्री शक्तीच्या बळावर आपल्या नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणनितीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास चीनचा प्रतिस्पर्धी देशांवर कुरघोडी करण्याचा उद्देश आहे. त्याचे चांगले उदहारण दक्षिण चीन समुद्र आहे.

अणवस्त्रांची संख्या पुढच्या दशकभरात दुप्पट करण्याचेही लक्ष्य चीनने ठेवले आहे. अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी पेंटागॉनने चीनकडे असलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अण्वस्त्र पाणबुडया, एअर डिफेन्स सिस्टिम, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमता याचा अभ्यास करुन त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर केला. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

लडाखमध्ये सुरु असलेला संघर्ष, त्याचबरोबर चिनी नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील वाढत्या हालचाली या पार्श्वभूमीवर पेंटागॉनच्या या अहवालाची भारत सरकारने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. आफ्रिकेतील डिजीबाऊटी येथे चीनने ऑगस्ट २०१७ मध्ये परदेशातील पहिला लष्करी तळ स्थापन केला. या तळाचे संचालन चिनी नौदलाकडून केले जाते. त्यानंतरच चिनी नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालीत वाढ झाली. त्याशिवाय चीनचा पाकिस्तानातील कराची, ग्वादर बंदरातही कुठल्याही आडकाठीशिवाय मुक्तपणे वावर सुरु असतो.

पेंटागॉनच्या अहवालानुसार, थायलंड, म्यानमार, सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका, यूएई, केनिया, सेशेल्स, टांझानिया, तजाकिस्तान या देशांमध्ये चीनचे लष्करी तळ उभारण्याचे उद्दिष्टय आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरु आहेत. रिपोर्टनुसार, एकूण ३५० युद्धनौका चीनकडे आहेत. चीनने यामध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. २९३ युद्धनौका अमेरिकेकडे आहेत. टेक्नोलॉजीच्या अंगाने पाहिल्यास, चीनपेक्षा अमेरिका बरीच पुढे आहे. १० हजार टन वजनाच्या ११ विमानवाहू युद्धनौका अमेरिकेकडे आहेत. अमेरिकेच्या एका युद्धनौकेवर ८० ते ९० फायटर विमानांना सामावून घेण्याची क्षमता आहे. तेच चीनकडे अशा फक्त दोन युद्धनौका आहेत. पण चीन आणखी दोन विमानवाहू युद्धनौकांची बांधणी करत आहेत. एका भारतीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १० युद्धनौका बांधणीचे चीनचे लक्ष्य आहे.