भारतासाठी धोक्याची सूचना, या देशांमध्ये लष्करी तळ उभारत आहे चीन

मागील काही महिन्यात चीनचे अनेक देशांसोबतचे संबंध बिघडले आहेत. सीमावादावरून देखील भारतासोबत तणाव निर्माण झाला असून, लडाख भागात चीनच्या कुरघोडी सुरूच आहे. चीन आता देशातील सर्वात मोठे नौदल असलेला देश झाला आहे. त्यामुळे आता त्याचे लक्ष भारत-प्रशांत क्षेत्रात पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार येथे आपल्या नौदलाचे अड्डे बनविण्याच्या तयारीत आहे. याशिवाय आपल्या आण्विक शस्त्रांची संख्या देखील वेगाने दुप्पट करत आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागनने अमेरिकन काँग्रेसला एका अहवाल सोपवला आहे. या अहवालानुसार चीन पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमारसह भारताच्या आजुबाजूला असलेल्या देशात लष्करी तळ उभारत आहे. यामध्ये थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, केनिया, संयुक्त अरब अमिरात, सेशल्स, तंझानिया, अंगोला आमि तजाकिस्तानचा समावेश आहे. चीन लांब पल्ल्यावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र, अणवस्त्र सबमरीन, इंटिग्रेटेड एअर डिफेन्स आणि अंतराळ-इलेक्ट्रॉनिक युद्धाची क्षमता वाढवत आहे.

चीनची ही चाल भविष्यात भारतासाठी समस्या निर्माण करू शकते. कारण चीन हिंद महासागर क्षेत्रात आपल्या नौदलाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे भारतासोबत तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते.

पेंटागनच्या या अहवालात म्हटले आहे की, चीनजवळ सध्या 350 युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. चीनने आता अमेरिकेला देखील नौदलात मागे टाकले आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या ताफ्यात 293 युद्धनौका आहेत.