बँकेत एफडी करायची पद्धत झाली जुनी, या योजनेत मिळेल अधिक व्याजदर

सर्वसाधारणपणे व्यक्ती फिक्सड डिपॉझिट म्हणून गुंतवणूक करताना सर्वात प्रथम बँकेला प्राधान्य देत असते. मात्र बँकेत एफडी म्हणून गुंतवणूक करण्याचे चलान आता जुने होत चालले आहे. एसबीआय 5 वर्षांच्या एफडीसाठी 5.4 टक्के दराने व्याज देते. वृद्धांसाठी हे व्याज 6.2 टक्के आहे. इतर बँका देखील काहीशा याच दराने व्याज देतात. मात्र अशा अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही ठराविक मुदतीसाठी गुंतवणूक करून मोठे व्याज मिळवू शकता. अशाच काही योजनांबाबत जाणून घेऊया.

Image Credited – navbharattimes

सुकन्या समृद्धी योजना –

या योजनेत तुम्हाला 7.6 टक्के दराने व्याज मिळते. ही योजना केवळ मुलींसाठी असून, मुलींचे शिक्षण आणि लग्नाच्या वेळी पालकांना मदत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. मुलीच्या नावाने खाते उघडून यात वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. एक कुटुंब जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावाने खाते उघडू शकते. 21 वर्षांच्या आधी हे खाते बंद करता येत नाही. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कर देखील आकारला जाणार नाही.

Image Credited – navbharattimes

वॉलेंटरी प्रोव्हिडेंट फंड –

जर एखादा कर्मचारी एंप्लॉयी प्रोव्हिडेंट फंड (ईपीएफ) अंतर्गत नोंदणीकृत आहे, तर तो कर्मचारी अतिरिक्त रक्कम देखील गुंतवू शकतो ज्यास वॉलेंटरी प्रोव्हिडेंट फंड असे म्हणतात. या फंड अंतर्गत तीन टप्प्यात करात सवलत मिळते. या फंडमध्ये गुंतवूक केल्याने सेक्शन 80सी अंतर्गत करात सवलत मिळते. दरवर्षी व्याजाद्वारे होणारी कमाई देखील करमुक्त असते. या फंडची एकमेव समस्या म्हणजे तुम्ही यातील रक्कम काढू शकत नाही. केवळ निवृत्तीनंतरच यातील रक्कमेचा लाभ घेता येतो. या फंडमध्ये जवळपास 8.5 टक्के व्याज मिळते.

Image Credited – navbharattimes

वरिष्ठ नागरिक बचत योजना –

वरिष्ठ नागरिक बचत योजना ही सरकारची योजना असून, 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या भारतीयांसाठी सुरू करण्यात आली आहे. खाते उघडल्यानंतर 5 वर्षाने कालावधी पुर्ण होतो. मात्र कालावधी एकदाच 3 वर्षांसाठी वाढवता येतो. या बचत योजनेत 1 हजार रुपयांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यावर सध्या 7.40 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यात करात देखील सवलत मिळेल.