कंगनाच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याला रविनाचे सडेतोड उत्तर


आपल्या जेवढ्या रोखठोक वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत असते तेवढीच ती आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. अंमली पदार्थ (ड्रग्स) सेवनाची बाब अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असलेल्या तपासादरम्यान समोर आली. अशातच कंगनाने एका मुलाखती दरम्यान इंडस्ट्रीमध्ये ९९ टक्के लोक ड्रग्ज घेतात, असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर ट्विट करत हे सगळे पाहून शांत असणाऱ्या बॉलिवूडला महेश जेठमलानी यांनी प्रश्न विचारला. तर यावरुन कंगनाला अभिनेत्री रविना टंडनने चांगलेच झापले आहे.

बॉलिवूडमधील ९९ टक्के लोक ड्रग्ज घेतात, असे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने एका मुलाखतीमध्ये केल्यानंतर महेश जेठमलानी यांनी ट्विट केले. अभिनेत्री रविना टंडनने त्यांच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. जगभरात ९९ टक्के नेता, बाबू, अधिकारी आणि पोलिस भ्रष्टाचारी आहेत. हे वक्तव्य सर्वांसाठी लागू होत नाही. लोक अतिशय हुशार आहेत. त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक कळतो. सफरचंद टोपलीतील एक नासके फळ इतर फळांना नासवू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही चांगली तर काही वाईट माणसे आहेत, या आशयाचे ट्विट करत रविनाने कंगनाला सडेतोड उत्तर दिले आहे.

दरम्यान आज पुन्हा ट्विट करत कंगनाने बॉलिवूडमधील कलाकारांवर निशाणा साधला आहे. रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी या दिग्गज अभिनेत्यांनीदेखील त्यांची ब्लड टेस्ट करावी, असे मला वाटते. कारण कोकिनचे सध्या रणवीर, रणबीर या अभिनेत्यांना व्यसन असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, तुम्ही ड्रग्स टेस्ट करुन घ्या. जर त्यांच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या. तर हेच कलाकार इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरु शकतील, असे कंगनाने ट्विट करत म्हटले आहे.