रामदास आठवलेंची गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर


नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांची नावे चर्चेत आहेत. दोघांचाही समावेश काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांची निवड करण्यात यावी, असे मागणी करणारे पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये होता. होते. त्यामुळे पक्षातूनच आझाद आणि सिब्बल यांच्यावर टीका झाल्याचे समोर आले होते. या दोन्ही नेत्यांना या टीकेचा हवाला देत काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे.

हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्याही या पत्रावर स्वाक्षऱ्या होत्या. काँग्रेस कार्यसमितीच्या या पत्रानंतर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांवर टीका झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण नंतर त्यावर पक्षाकडून आणि दोन्ही नेत्यांकडून पडदा टाकण्यात आला.

दरम्यान रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या पक्षातंर्गत वादानंतर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी प्रचंड मेहनत घेतली. राहुल गांधीजी जर त्यांच्यावर आरोप करत असतील, तर त्यांनी पक्ष सोडावा. भाजपमध्ये त्यांचे स्वागत करण्यास तयार असल्याची ऑफर आठवले यांनी दिली आहे.