बिग बॉसच्या घरात होऊ शकते राधे माँ यांची एण्ट्री


छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय त्याचबरोबर वादग्रस्त अशा ‘बिग बॉस’ या रियालिटी शोचे १४वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे या शोच्या प्रेक्षकवर्गाचे लक्ष लागले आहे. दरम्यान अद्याप तरी शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी समोर आलेली नाही. पण आता राधे माँ या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सर्वच माध्यमांमध्ये रंगल्या आहेत.

यासंदर्भात ‘टेली चक्कर’या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉसच्या १४व्या पर्वासाठी राधे माँ यांनी होकार दिला असून बिग बॉसच्या १३ व्या पर्वासाठी देखील बिग बॉसच्या निर्मात्यांनी राधे माँ यांना विचारले होते. पण काही कारणास्तव त्यांनी नकार दिला होता. पण आता आगामी सीझनमध्ये राधे माँ या दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत राधे माँ यांच्या टीमकडून किंवा बिग बॉसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘द खबरी’ या ट्विटर हँडलने देखील ट्विट करत बिग बॉस १४मध्ये राधे माँ दिसणार असल्याचे म्हटले आहे. बिग बॉस १४साठी राधे माँ यांना विचारण्यात आले होते. त्यांना बिग बॉसच्या घरात तुम्हाला पाहायला आवडेल का? असे ट्विटमध्ये म्हटले आहे.