सीमेवरील तणावाचे पडसाद; PUBG सहित 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी

भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पबजीसह 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. याआधी देखील सरकारने चीनी कंपन्यांच्या अनेक मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातलेली आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातलेल्या अॅप्सला देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व, एकतेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅप्सवर बंदी घातल्याची माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम 69 अ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. हे सर्व 118 अॅप्स विविध प्रकारचा धोका निर्माण करत होते. ज्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

सरकारने ज्या 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे त्यामध्ये पबजी, APUS लॉन्चर प्रो थीम, APUS सिक्योरिटी-एंटीवायरस, APUS टर्बो क्लिनर 2020, शाओमीचे शेअर सेव्ह, फेसयू, कट कट, बायडु, कॅमकार्ड व्हिचॅट रीडिंग, पिटू, इन नोट, स्मॉल क्यू ब्रश, साइबर हंटर, लाइफ आफ्टर इत्यादी अॅप्सचा समावेश आहे.

दरम्यान, याआधी देखील सरकारने चीनविरोधात कारवाई करत जूनमध्ये 59 आणि त्यानंतर 47 अशा एकूण 106 चीनी अॅप्सवर बंदी घातली होती.