राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा; मंदिराच्या नकाशांना प्राधिकरणाकडून मंजुरी


अयोध्या – राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून दोन नकाशे सोपवण्यात आले होते. त्या नकाशांना बैठकीदरम्यान अयोध्या विकास प्राधिकरणाकडून राम मंदिराच्या नकाशांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती बुधवारी अयोध्या विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आयुक्त एम.पी.अग्रवाल यांनी दिली.

दोन नकाशे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सोपवण्यात आले होते. त्यापैकी एक लेआऊट जो २ लाख ७४ हजार चौरस मीटरचा होता. तर दुसरा मंदिराचा नकाशा, जो १२ हजार ८७९ चौरस मीटरचा होता. १४ सदस्य संचालक मंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर या नकाशांना सर्वसंमत्तीने मंजुरी देण्यात आल्याचे अग्रवाल म्हणाले. यावर लागू असलेल्या टॅक्सची माहिती घेतली जात आहे. ते जमा केल्यानंतर हे नकाशे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता मंदिराच्या नकाशाला मंजुरी मिळाल्यामुळे आता मंदिर उभारणीचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे ट्रस्टच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान राम मंदिराच्या पाच एकर क्षेत्रात असलेल्या जुन्या मंदिरांच्या साफसफाईचे काम सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी एल अँड टी कंपनीची मशीन पोहोचली असून काम सुरू करण्यात आले आहे. तर एक दोन दिवसात त्या ठिकाणी आणखी काही मशीन येतील. मंदिरासाठी खोदकाम सुरू करून त्याचे पिलर उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्त यांनी सांगितले.