पीएम केअर्समधील देणगीदारांची नावे जाहीर करण्यास भिती कसली ? – चिदंबरम

कोव्हिड-19 संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पीएम केअर्स फंडची सुरुवात करण्यात आली होती. या फंडमध्ये अवघ्या 5 दिवसात 3,076 कोटी रुपये जमा झाले होते. याची माहिती सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आली आहे. 27 ते 31 मार्च या दरम्यान ही रक्कम जमा झालेली आहे. यातील 3075.85 कोटी रुपयांचा निधी हा स्थानिक आणि स्वैच्छिक आहे. तर 39.67 लाख रुपयांचे योगदान परदेशातून आलेले आहे.

पीएम केअर्स फंडच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, 2.25 लाख रुपयांद्वारे फंडची सुरुवात करण्यात आली होती. या फंडला जवळपास 35 लाख रुपयांचे व्याज स्वरूपात देखील मिळाले आहे. ऑडिट स्टेटमेंट पीएम केअर्स फंडच्या वेबसाईटवर शेअर करण्यात आलेले आहे. मात्र यामध्ये निधी देणाऱ्या व्यक्तींची माहिती देण्यात आलेली नाही. यावरून आता माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निधी देणाऱ्यांचे नाव का सांगण्यात आले नाही ? असा सवाल त्यांनी केला आहे.

चिदंबरम यांनी ट्विट केले की, रक्कम दान करणाऱ्यांचे नाव जाहीर केले जाणार नाही. का ? प्रत्येक एनजीओ किंवा ट्रस्टला एका सीमेपेक्षा अधिक रक्कम दान करणाऱ्या व्यक्तींचे नाव जाहीर करणे अनिवार्य आहे. यापासून पीएम केअर्स फंडची सुटका का ?

चिदंबरम यांनी प्रश्न केला की, दान मिळवणारा माहिती आहे. दान मिळवणाऱ्या ट्रस्टीची देखील माहिती आहे. पंरतू, ट्रस्टी दान करणाऱ्यांचे नाव समोर आणण्यास का घाबरत आहे ?