निलेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका; लाज असेल तर राजीनामा दे आणि हो बाजुला


मुंबई : एका मोठ्या प्रकरणावरून गेले अनेक दिवस युवासेना अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर संशय घेतला जात आहे. त्यांचे नाव जरी या प्रकरणात प्रत्यक्षपणे समोर येत नसले तरी आदित्य ठाकरेंवर नेत्यांच्या टीकेचा रोख असलेला दिसून आला आहे. आता, अतिशय बोचरे ट्विट करून आदित्य ठाकरेंवर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

भाजपने सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशीवरून राज्य सरकारवर टीकेचे सत्र सुरु केलेले असतानाच सीबीआय चौकशी केली गेली, तर अनेक बड्या व्यक्तींची नावे या प्रकरणी उलगडू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात असून तपासासाठी वेळ घालवण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत होते. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलच्या मुद्द्यावरून आता त्यांना लक्ष्य केले जात आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अकाऊंटवर मंत्रीपदाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. तर, हा उल्लेख आताच्या परिस्थितीमध्ये काढून टाकण्यात आल्याची टीका देखील व्हायरल होत होती.

आदित्य ठाकरे यांना भाजपाचे नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून आव्हान दिले असून ट्विटरद्वारे अतिशय जहरी टीका केली आहे. शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही… खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो, असे ट्विट त्यांनी केले आहे. आता निलेश राणेंच्या या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे देखील महत्वाचे आहे.