ATM मधील फसवणूक रोखण्यासाठी SBI च्या नव्या सेवेला सुरुवात


नवी दिल्ली – कोरोना संकटकाळात ऑनलाईन फसवणुकीचे एका प्रकारे पेवच सुटले होते. त्यातच आरबीआयच्या कडक नियमांनंतरही ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) या वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेत आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षित बँकिंगसाठी नवी एटीएम सेवा सुरु केली आहे.

यासंदर्भातील माहिती एसबीआयने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बँकेने केलेल्या ट्विटमध्ये जेव्हा एटीएममधून बॅलन्स किंवा मिनी स्टेटमेंट चेक करण्याची मागणी बँकांकडे होईल, तेव्हा ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून अलर्ट करण्यात यावे. कारण यामुळे हा संबंधित ग्राहकाद्वारेच व्यवहार होत आहेत की नाही, याची खात्री पटवता येईल.

त्याचबरोबर ग्राहक स्वतः आपल्या डेबिट कार्डद्वारे व्यवहार करतो आहे की नाही हे यामुळे लक्षात येईल. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होईल आणि ग्राहकांना सुरक्षित बँकिंगची सुविधा मिळेल. जर इतर कोणी व्यवहार करत असेल तर एसएमएसद्वारे ग्राहकाला सूचना मिळाल्याने, तो तात्काळ आपले डेबिट कार्ड ब्लॉक करु शकेल, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एसबीआयने आपल्या ४४ कोटींपेक्षा अधिक बचत खातेधारकांना दिलासा दिला आहे. खातेधारकांना दिलासा देताना एसबीआयने नुकतेच काही सेवांवरील शुल्काची आकारणी बंद केली होती. यामध्ये एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बॅलन्सचा समावेश होता. त्यामुळे आता ग्राहकांकडून एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बॅलन्ससाठीचे शुल्क वसूल केले जाणार नाही, ही सेवा मोफत झाली आहे. त्याचबरोबर बँकेने हे देखील म्हटले आहे की, बँकिंगच्या अनावश्यक अॅप्सपासून सुटका करुन घेण्यासाठी ग्राहकांनी YONOSBI हे एकच अॅप डाउनलोड करावे.