कोरोनामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन


पुणे – बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर रुग्णालयात उपचारांदरम्यान पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील पत्रकारांनी त्यांची प्रकृती अधिकच बिघडत चालली असताना खासगी रुग्णालयात त्यांना उपचार घेता यावेत यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आपल्या सहकारी मित्राचा जीव ते वाचवू शकले नाहीत. सध्याच्या परिस्थितीत वेळेत सुविधा उपलब्ध होऊ न शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा पुण्याच्या पत्रकारिता वर्तुळात सुरु आहे.

मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या कोपरगाव या गावी टीव्ही ९ या वृत्त वाहिनीत पुण्याचे प्रतिनिधी असलेले पांडुरंग रायकर हे गेले नव्हते. पांडूरंग यांनी गावी जाण्यापूर्वी अँटीजन चाचणी करुन घेतली होती, ती निगेटिव्ह आल्यानंतर ते विश्रांतीसाठी गावी गेले होते. पण तिथे गेल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर स्वॅब टेस्ट केल्यावर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

दरम्यान, पुढील चांगल्या उपचारांसाठी कोपरगावमध्येच रूग्णालयात दाखल होण्यासाठी त्यांनी चौकशी केली. या रुग्णालयाने (नाव समजू शकले नाही) त्यांना ४० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. पण खर्च जास्तच असल्याने त्यांनी थोडा विचार करून, पुण्यातील शिवाजीनगर येथे नुकत्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये ते उपचारासाठी दाखल झाले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू झाले, पण त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.

८० वर पांडुरंग यांची ऑक्सिजनची पातळी होती. ही चिंतेची बाब असल्याने काल दिवसभर पुण्यातील पत्रकार अनेक रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी बोलून व्हेंटिलेटर बेडसाठी प्रयत्न करीत होते. दरम्यान, पांडुरंग यांच्या ऑक्सिजनच्या पातळीत सुधारणा होत ती ८५ पर्यंत गेली, ही सर्वांसाठीच काहीसी समाधानाची बाब होती. हळूहळू ऑक्सिजनची पातळी वाढेल, असे सर्वांना वाटत होते. तेवढ्यात संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध झाला. पण तिथे दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका पाहिजे होती. पण त्यांना नेण्यासाठी पहाटेपर्यंत रुग्णवाहिका मिळू शकली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

जम्बो रुग्णालयातील डॉक्टरांकडून काही मिनिटांपूर्वी सांगण्यात आले की, पांडुरंग यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. पांडुरंग यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या पत्रकार सहकाऱ्यांना हे समजताच धक्काच बसला. आपण एवढे प्रयत्न करूनही आपल्या सहकाऱ्याला वाचवू शकलो नाही, याची खंत सर्वांच्या मनात आहे. मागील सहा महिन्यांत पांडुरंग रायकर यांनी कोरोनाच्या असंख्य बातम्या केल्या. त्यामध्ये सीईओपी मैदानावर जम्बो कोविड सेंटर सुरू होणार या बातमीचादेखील समावेश आहे. त्यांना आज त्याच उभारलेल्या रुग्णालयात मृत्यूला सामोरे जाण्याची वेळी आली. आजवर अनेककदा प्रसारमाध्यमांनी प्रशासनाकडे नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, अशी मागणी केली होती. पण एक पत्रकार याच ढिसाळ व्यवस्थेचा बळी ठरला असल्याची चर्चा आहे.