फेसबुकची नवीन पॉलिसी, कायदेशीर अडचण आल्यास कोणत्याही पोस्टला हटवणार

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक आपल्या पॉलिसीमध्ये 1 ऑक्टोंबरपासून बदल करणार आहे. फेसबुकने जगभरातील युजर्सला पॉलिसीमध्ये करण्यात आलेल्या बदलांविषयी नॉटिफिकेशन पाठवले आहे. फेसबुकने म्हटले आहे की, कोणत्याही कायदेशीर अडचणीत सापडण्याचा धोका असल्यास आपल्या प्लॅटफॉर्मवरील पोस्ट अथवा काँटेटला हटवले जाईल.

फेसबुकने एका पॉलिसीद्वारे युजर्सला नवीन पॉलिसीची माहिती देत सांगितले की, कोणताही कायदेशीर आणि नियामक प्रभाव टाळण्यासाठी फेसबुक तुमचे काँटेट, सेवा व माहिती हटवू शकते अथवा प्रतिबंधित करू शकते.

थोडक्यात सांगायचे झाले तर फेसबुक कोणत्याही कायदेशीर अडचणीत अडकल्यास तुमची पोस्ट डिलीट करू शकते. ही नवीन पॉलिसी फेसबुकच्या टर्म्स ऑफ सर्व्हिसच्या सेक्शन 3.2 अंतर्गत लागू करण्यात आलेली आहे.

मागील अनेक दिवसांपासून फेसबुकच्या पॉलिसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट फेसबुकने हटवल्या नसल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. त्यानंतर आता फेसबुकने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. मात्र कोणत्या पोस्टमुळे फेसबुक कायदेशीर समस्या निर्माण होत आहे ? हे कसे कळणार असा प्रश्न युजर्स विचारत आहेत.