गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण; ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती


पणजी: देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाने आजवर सर्वसामान्यांसह अनेक राजकीय नेत्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा देखील समावेश झाला आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सध्या आपण होम आयसोलेशनमध्ये राहणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आली असून कोरोनाची कोणतीही लक्षणे माझ्या शरीरात दिसलेली नाहीत. त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. घरातूनच मी माझे काम करेन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गोव्यात काल कोरोनाचे ५८८ नवे रुग्ण आढळून आले. राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत १८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून १९४ जणांनी जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत १३ हजार ५७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. काल दिवसभरात २७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.