पांडुरंग रायकरच्या मृत्युला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार : संदीप देशपांडे


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. जर जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पार पाडता येत नसेल तर त्यांनी त्या पदावर राहू नये, असा देखील घणाघात संदीप देशपांडे यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला जबाबदार असून त्यांचा त्यांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाला. यंत्रणा तुम्ही नीट चालवत नाहीत. यंत्रणा नीट चालते की नाही, याची माहिती घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे. त्यांना ती जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये. तुम्हाला घरी बसवण्यासाठी मुख्यमंत्री केलेले नाही, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठीच मुख्यमंत्री बाहेर येणार का? लोकांचे दुःख जाणून घ्यायला कधी रस्त्यावर उतरणार?, असे सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले. रुग्णाला योग्य उपचार न मिळणे, हे राज्य सरकारचं अपयश आहे. कुणाचेही यातून जाणे ही दुदैवी घटना आहे. तुम्ही जर एखाद्या पत्रकाराला बेड, रुग्णवाहिका मिळवून देऊ शकत नसाल तर मग तुम्ही लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारत असलेल्या कोव्हिड सेंटरचा काय उपयोग?, असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. रुग्णांना कोव्हिड सेंटरमध्ये उपचारच मिळत नसतील तर तिथे फक्त पैसे ओरपण्याचे काम सुरु आहे. तिथे जे रुग्ण बरे होत आहेत, ते राम भरोसे असल्याचे संदीप देशपाडे म्हणाले.

गेल्या 5 महिन्यात पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासारख्या हजारो घटना घडल्या आहेत. बीकेसी, नेस्को किंवा परवा पुण्यात उद्घाटन झालेले कोव्हिड सेंटर असेल, यात लोकांना उपचार मिळत नसतील तर सरकारला लाज वाटली पाहिजे. मोठी मोठी कंत्राट द्यायची, पण त्याचा काय फायदा?, असा सवाल संदीप देशपांडेंनी केला.