लडाखमध्ये राफेलच्या तैनातीमुळे चिनी ड्रॅगनची टरकली


नवी दिल्ली – लडाखमध्ये चिनी ड्रॅगनची सुरु असलेली वळवळ पाहता फ्रान्समधून आणलेली प्रगत राफेल लढाऊ विमाने भारताने चीनला लागून असलेल्या सीमाभागात तैनात केली आहेत. चीनने हे लक्षात घेता सीमेवर आपली देखील लढाऊ विमाने तैनात केली आहेत. याबाबत सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यान पुन्हा कारवाईची शक्यता लक्षात घेता चीनने लडाख प्रदेशात लढाऊ विमाने तैनात केली होती. लडाखच्या पेंगाँग तलावाच्या दक्षिणेकडील काठावर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वायुसेनेने (पीएलए) पाचव्या पिढीचे लढाऊ विमान जे -20 तैनात केले आहे.

या भागात अद्यापही विमाने मोठ्या प्रमाणात उड्डाण करत आहेत. सरकारी सूत्रांनी सांगितले की, चीनच्या हवाई दलाने हॉटन एअर बेसवर जे-20 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. लडाख आणि लगतच्या भारतीय प्रदेशाच्या जवळ ती उड्डाण करणार आहेत. चिनी सैन्यामार्फत अद्यापही मोक्याचा ठिकाणी बॉम्बर विमाने तैनात केली जात आहेत. लडाखजवळील हवाई तळांवर आपले अत्याधुनिक व सर्वात सक्षम विमान चीनच्या हवाई दलाने पुन्हा कार्यान्वित करण्याची ही कारवाई भारताने गांभीर्याने घेतली आहे.

चीनला लागून असलेल्या सीमेवर भारताने मोठ्या संख्येने लढाऊ विमाने तैनात केली आहेत. भारतीय हवाई दलात पाच राफेल विमाने सामील झाली आहेत, तर पुढील काही महिन्यांत आणखी तीन ते चार राफेल विमाने हवाई दलात दाखल होणार आहेत. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे -20 आणि इतर विमाने चीनने मोठ्या प्रमाणावर तैनात केली आहेत, ती विमाने मुख्यत्वे लडाख प्रदेशातील वेगवेगळ्या विमानतळांवरून उड्डाण करत आहेत. लडाखच्या पलीकडची बाजू आणि इतर भागांचा यात समावेश आहे. या भागात जे -20 विमाने यापूर्वी चीनने तैनात केली होते. नंतर त्यांना दुसर्‍या चिनी तळावर तैनात करण्यात आले होते.