४० कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे नाशिकमधील नोटछपाई काही दिवसांसाठी बंद


नाशिक – नाशिकमधील चलन मुद्रणालयात आणि सभोवतालच्या परिसरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नोटछपाई पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची मुद्रणालयातील ४० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना लागण झाली असून एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे गुरुवारपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे येथील नोटा छपाई, मुद्रांक, पारपत्र छपाई बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आय.पी.एस मजदूर संघाचे पदाधिकारी जगदीश गोडसे यांनी दिली.

मुद्रणालयात कार्यरत असलेले साडेतीन हजारांहून अधिक कामगार तणावाखाली असून मुद्रणालयापासून जवळच्या वसाहतीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हे क्षेत्र मनपाने प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहे. या भागात मुद्रणालयातील अनेक कामगार राहतात. मुद्रणालयात नाशिकरोड परिसरासह चार तालुक्यांतील कामगार कामावर ये-जा करतात. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मुद्रणालयातही केले जात नसल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाप्रबंधकाशी चर्चा झाल्यानंतर कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी मुद्रणालय बंद राहणार आहे.

स्थानिक व्यवस्थापनावर उत्पादनाला बाधा न येण्यासाठी कामाचे दिवस आणि सुटय़ांची जोडणी करत सुटय़ांबाबतचा निर्णय सोडण्यात आला होता. त्याप्रमाणे मजदूर संघ आणि दोन्ही मुद्रणालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन रविवारपासून ३ सप्टेंबपर्यंत काम बंद ठेवण्यात आले आहे. रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे. त्यानंतर सोमवारी, मंगळवारी गणेश विसर्जनाची सुटी आणि मुख्य कार्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार दोन दिवस असे चार दिवस काम बंद राहणार आहे. या काळात आवश्यक पुरवठा पाठविण्याची गरज असल्यास किंवा इतर महत्त्वाचे काम असल्यास संबंधित कामगार कामावर येतील. दोन्ही मुद्रणालये ४ सप्टेंबर रोजी नियमित सुरू होणार आहेत.