तयार रहा! शिवभोजन, इंदिरा रसोईनंतर येत आहे ‘मोदी इडली’


सेलम – आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती फक्त आपल्या देशातच नव्हेतर परदेशात देखील आहे, हे काही आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. पण संपूर्ण देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे वर्ल्ड लीडर्स रेटींगमध्ये घसरण झाली असली, तरी मोदींच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. आता हेच उद्देशून तामिळनाडूमध्ये नरेंद्र मोदींच्या नावाने इडली विकण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मोदी इडली असे नावही या इडलीला देण्यात आले आहे.

तामिळनाडूच्या सेलम शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही इडली विकण्यात येत आहे. मोदी इडलीची विक्री शहरातील जवळपास २५ ते ३० दुकानांमध्ये केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात मोदी इडली विक्रीस संपूर्ण शहरात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांच्या नावावर सेलम शहरात जागोजागी ‘मोदी इडली’ची जाहिरात केली जात आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टर्सचीच चर्चा सुरु आहे. ग्राहकांना मोदी इडलीमध्ये १० रुपयात ४ इडली खाण्यास मिळतील. त्याच बरोबर एका वाटीत सांबार आणि चटणी देखील देण्यात येणार आहे. तसेच १० रुपयात ग्राहकांचे पोट भरेल असा दावा देखील करण्यात येत आहे.

तामिळनाडूतील भाजप नेते महेश यांच्या डोक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर इडली विकण्याची आयडिया आली. शहरात त्याचे पोस्टर्स झळकावून त्यांनी जाहिरातही केली. सध्या पंतप्रधानांसोबत इडलीचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. मोदी इडली ही खाण्यास स्वादिष्ट असेल, ताज्या आणि शुद्ध भाज्यांनी सांबार बनवण्यात येईल. दिवसाला ४० हजार इडली बनवण्यात येईल, अशी माहिती भाजप नेते महेश यांनी दिली आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या फोटोत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. उजव्याबाजूला भाजप नेते महेश यांचा फोटो आहे. १० रुपयात मोदी इडली मिळणार आहे. त्यात ४ इडलीचा समावेश असेल, पुढील आठवड्यापासून ही विक्री शहरात सुरु होईल, असा उल्लेख पोस्टर्सवर करण्यात आला आहे.

भाजपचे प्रदेश सचिव भारत आर. बालासुब्रमण्यम यांनी माध्यमांशी बोलताना सुरुवातीला मोदी इडली विक्रीसाठी काही दुकाने उघडण्यात येतील. लोकांचा याला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या आधारे मोदी इडली दुकानांची संख्या वाढवण्यात येईल अशी माहिती दिली.