गणेश विसर्जन 2020 : ना ढोल-ताशांचा गजर, ना गुलालाची उधळण, ना फटाक्यांची आतषबाजी, ना भलीमोठी मिरवणूक


पुणे – आज लाडक्या गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… असे म्हणत निरोप देण्याचा दिवस असून दरवर्षी ज्याप्रमाणे ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे बाप्पाला सोशल डिस्टनसिंग आणि शांततेत निरोप दिला जात आहे. यंदाच्या वर्षी दिमाखदार विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडणार नसला तरी विसर्जनाच्या दिवशी ठेवण्यात येणारा बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे.

मुंबई आणि पुण्यातील माहौल अनंत चतुर्दशीला कसा असतो, हे तुम्हाला काही वेगळे सांगण्याची गरज नाही. पण मुंबईचा राजा, लालबागचा राजा किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी यंदाचे विसर्जनाचे चित्र पूर्णत: वेगळे आहे. तर देशभरात पुण्यातील गणेशोत्सवाची ख्यातीही आहे, कोरोना संकटामुळे येथेही साधेपणात विसर्जन सोहळा पार पडण्यास सुरुवात झाली असून मानाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन केले जात आहे. मिरवणुकीच्या आदल्या दिवशी सायंकाळनंतर मंडळांचे कार्यकर्ते ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मिरवणूक मार्गावर यायचे. त्यानंतर रांगा लावणारे कार्यकर्ते आणि पोलीस मिरवणूक मार्गावर असायचे. यंदा हे दृश्य पाहायला न मिळल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

आदल्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची तयारी सुरू व्हायची. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीतील आकर्षक रथ तसेच सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरत असे. आदल्या दिवशी विसर्जन मार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली आणून रात्रभर त्यावर सजावटीचे काम करायचे. कार्यकर्ते रात्रभर जागरण करून पुन्हा मिरवणुकीत सहभागी व्हायचे. विसर्जन मिरवणुकीत साकारण्यात येणारे आकर्षक रथाचे काम यंदा पाहायला मिळाले नाही. कोणता देखावा मिरवणुकीत साकारला जाणार आहे, याची उत्सुकता कार्यकर्त्यांबरोबरच सामान्यांना असते. पण कोरोनाचे सावट यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर असल्यामुळे मिरवणुकीच्या आदल्या दिवशीची लगबग तसेच जल्लोषी वातावरण पाहायला मिळाले नाही.

नोकरदारापासून उद्योजकापर्यंत साऱ्यांवरच कोरोनामुळे ओढवलेले आर्थिक संकट, कोरोनाची भीती आणि सरकारी र्निबध या कारणांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साहच दिसेनासा झाला आहे.अनेक कुटुंबे, गृहनिर्माण संस्था तसेच सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सवच रद्द केला तर, अतिशय शांततेत आणि साध्या वातावरणातच भक्तांनीही बाप्पाला निरोप द्यायचा ठरवले आहे.