बाबो! एवढ्या कोटींना विकली गेली जगातील सर्वात महाग मेंढी

स्कॉटलँडमध्ये झालेल्या लिलावात एक मेंढी तब्बल 490,000 डॉलर्सला (जवळपास 3.58 कोटी रुपये) विकली गेली आहे. ही जगातील सर्वात महाग मेंढी ठरली आहे. विक्रीच्या आधीपासूनच या मेंढीची जोरदार चर्चा होती. स्कॉटलँडच्या स्कॉटिश नॅशनल टेक्सल सेलमध्ये या मेंढीची विक्री झाली.

डबल डायमंड नाव असलेल्या मेंढीसाठी सुरुवातीला 13 हजार डॉलर्सची बोली लागली. मात्र बोली वाढतच गेली.  अखेर तीन लोकांनी मिळून ही मेंढी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

मेंढी खरेदी करणाऱ्यांपैकी एक असलेले जेफ एकेन म्हणाले की, घोड्यांच्या शर्यत किंवा गुरा-ढोरांच्या व्यवसायासारखाच हा एक व्यवसाय आहे. काही कालावधीनंतर असेच काहीतरी खास येत असते. काल अशीच एक विशेष मेंढी आली व प्रत्येकाला यात वाटा हवा होता.

टेक्सल मेंढी ही नेदरलँडमध्ये आढळणारी एक दुर्मिळ प्रजाती आहे. याआधी सर्वात महागड्या मेंढीच्या विक्रीचा विक्रम 2009 साली झाला होता. यावेळी 307,000 डॉलर्सला एका मेंढीची विक्री झाली होती.