स्वामींची पंतप्रधान मोदींना NEET/JEE परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची विनंती


नवी दिल्ली – जेईई व नीट परीक्षा घेण्याला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असली, तरी अनेक राज्यांचा परीक्षा पुढे ढकलण्याचा सूर अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. विद्यार्थी-पालक वर्तुळातून जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत असतानाच या मागणीला भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही पाठिंबा दिला आहे. शेवटचा प्रयत्न म्हणून मोदींना फोन करून स्वामी यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

सप्टेंबर महिन्यात अभियांभिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई व वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा नीट घेण्यात येणार आहे. तर जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार असून १३ सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थी-पालकांसह काही राज्यांनी कोरोनामुळे दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मागणी फेटाळत परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मावळलेली नाही.

विशेष म्हणजे परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच स्वामी यांनी ट्विट करून देशातील करोना परिस्थितीचा हवाला देत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा स्वामी यांनी पंतप्रधानांच्या कानावर ही मागणी घातली आहे. स्वामी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. दिवाळीनंतर जेईई व नीट परीक्षा घेण्यात याव्या, मी यासाठी सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी फोन करून शेवटचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयीन सचिवांनी फोन करून कळवतो, असे सांगितले आहे. जर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, तर मी विद्यार्थ्यांना कळवीन, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी हे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशातील स्थिती कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाल्यामुळे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याविषयी भूमिका घेण्याचे आणि पंतप्रधानांना कळवण्याचे आव्हान केले होते. कोरोना काळात विद्यार्थ्यांना सुरक्षित व्यवस्था पुरवण्यास राज्य असमर्थ ठरत असतील, तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तसे जाहीरपणे बोलावे आणि पंतप्रधानांनी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करावी, असे स्वामी म्हटले होते.