उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन मागे


पंढरपूर – मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांत नियमावली तयार करुन मंदिर खुली केली जातील, असे आश्वासन दिल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले असून प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरातील आंदोलन राज्य सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर मागे घेतले आहे. मंदिरे सुरु कऱण्यासाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान आश्वासन पूर्ण झाले नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊन आंदोलन करु, असा इशारा यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

दरम्यान आज मंदिरात जाऊन प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत १५ जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारकडून मंदिर, मशीद, बुध्दविहार सुरु केली जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासाठी सरकार नियमावली तयार करत असून त्यासाठी आठ दिवस लागतील, असे सांगितले आहे. पण जर आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना, आम्ही नियम मोडण्यासाठीच आलो असल्याचे सांगत आंदोलनाला जमलेल्या हजारोंच्या गर्दीचे समर्थन केले. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, या लोकांच्या भावना आहेत. शासनाला लोकच दाखवून देत आहेत. सरकारने हे पाहून आपली भूमिका बदलावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीमुळे वाढण्याची भीती असल्याचे सांगितले असता लोक जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हेच आम्हाला दाखवायचे असल्याचे त्यांनी सांगितले.