नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना डिस्चार्ज देण्यात आला असून 18 ऑगस्ट रोजी अमित शहा यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित शहा यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात काही दिवसांआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दाखल करण्यात आले होते.
एम्स रुग्णालयातून गृहमंत्री अमित शहा यांना डिस्चार्ज
दरम्यान, अमित शहा यांना याआधीही 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शहा यांनी स्वत:च ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.