दिवाळीपर्यंत देशातील कोरोना प्रसार नियंत्रणात येईल; केंद्रीय आरोग्य मंत्री


नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. त्यानंतर आता तब्बल पाच महिन्यांनंतर केंद्रातील मोदी सरकारकडून देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण देशातील कोरोनाबाधितांची दिवसागणिक वाढत असलेली संख्या चिंतेत भर टाकत आहे. त्यातच काल देशात कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील कोरोना कधी नियंत्रणात येईल, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना दिवाळीपर्यंत देशात कोरोना प्रसार नियंत्रणात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते अनंतकुमार फाऊंडेशनच्या वतीने आयोजित नेशन फर्स्ट वेबिनार सीरिजचे उद्घाटन झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी भारताची कामगिरी चांगली असल्याचे सांगितले. या वर्षी दिवाळीपर्यंत कोरोना नियंत्रणाखाली येईल. कोरोनाच्या साथीविरूद्ध नेत्यांसह सर्वसामान्यांनी एकजुटीने व प्रभावीपणे लढा दिला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्याच्या आधीच आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या आजपर्यंत २२ बैठका झाल्याचे हर्ष वर्धन म्हणाले.

देशात फेब्रुवारीपर्यंत एकच प्रयोगशाळा होती. त्यात वाढ करण्यात आली असून, सध्याच्या घडीला देशभरात १ हजार ५८३ प्रयोगशाळा आहेत. यापैकी एक हजाराहून अधिक सरकारी प्रयोगशाळा आहेत. देशात सुमारे दिवसाला १० लाख चाचण्या घेतल्या जात असून, याची संख्या ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा खूप जास्त असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर देशभरात आता पीपीई किट्स, व्हेटिंलेटर आणि एन ९५ मास्क यांची टंचाई राहिलेली नाही. देशात दररोज पाच लाख पीपीई किट तयार केले जात आहेत. एन ९५ मास्कचे १० उत्पादक उत्पादन करत आहेत. २५ उत्पादक व्हेटिंलटर तयार करत आहेत. वर्ष अखेरीपर्यंत लस तयार होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच येथपर्यंत पोहोचू शकल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.