‘ब्लॅक पॅथर’चे शेवटचे ट्विट ठरले सर्वाधिक लाईक मिळवणारे विक्रमी ट्विट


मागच्या आठवड्यात मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पॅथर’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता चॅडविक बॉसमन याचे वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले. चॅडविक बॉसमन मागील ४ वर्षांपासून कॅन्सर या रोगाविरोधात लढा देत होता. त्याच्या निधनानंतर जगभरातील चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. चॅडविकने भले जगाचा निरोप घेतला पण त्याने जाता जाता देखील इतिहास रचला आहे. ट्विटरच्या इतिहासातील त्याच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेले शेवटचे ट्विट सर्वाधिक लाईक मिळवणारे ट्विट ठरले आहे.

ही माहिती ट्विटरने आपल्या अधिकृत हँडलवरुन ट्विट करुन दिली आहे. आतापर्यंत 70 लाखांपेक्षा अधिक लाईक्स चॅडविकच्या या ट्विटला मिळाले आहेत. तसेच यावर २३ लाखांहून अधिक नेटक-यांनी कमेंट दिल्या आहेत. तर 31 लाखांपेक्षा अधिक वेळा हे ट्विट रिट्विट केले गेले.

चॅडविकचा एक हसरा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो टिष्ट्वटरच्या इतिहासातील सर्वाधिक लाईक मिळवणा-या या ट्विटमध्ये आहे. त्यासोबत एक संदेश आहे. ज्यात त्याच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. चॅडविकला 2016 मध्ये तिस-या स्टेजचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते, अशी माहितीही या संदेशात देण्यात आली आहे.