मुंबई विमानतळावर अदानी समूहाची मक्तेदारी, खरेदी करणार 74% हिस्सेदारी

अदानी समूह मुंबई विमानतळाची तब्बल 74 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. याबाबत समूहाने सांगितले की, मुंबई विमानतळाच्या हिस्सेदारी अधिग्रहणाचा करार त्यांनी केला आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचा उद्देश देशातील सर्वात मोठी विमानतळळ संचालक कंपनी बनणे हे आहे. मुंबई हे सध्या देशातील दुसरे सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे.

याबाबत अडाणी एंटरप्राइजेसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सने जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्ससोबत विमानतळाच्या अधिग्रहणावर करार केला आहे. दोन्ही कंपन्यांनी या करारातील आर्थिक व्यवहाराचा खुलासा केलेला नाही.

अदानी समूहाने सांगितले की एअरपोर्ट्स कंपनी ऑफ साउथ आफ्रिका आणि बिडवेस्टची 23.5 टक्के हिस्सेदारी देखील विकत घेणार आहे. यासाठी कंपनीला सीसीआयची देखील मंजूरी मिळालेली आहे. हा करार पुर्ण झाल्यानंतर कंपनीकडे जीव्हीकेच्या 50.50 टक्के हिस्सेदारीसह एकूण 74 टक्के हिस्सेदारी असेल.

अदानी समूहाला काही दिवसांपुर्वीच विमानतळ संचालनाचे कंत्राट मिळाले आहे. यामध्ये लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूचा समावेश आहे.