…यामुळे नेटफ्लिक्सवरुन गायब झाला ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर


नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ या वेबसिरीजचा ट्रेलर हटवण्यात आला आहे. नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने भारतातील कुप्रसिद्ध शक्तिशाली भांडवलदारांच्या भ्रष्टाचारांचा आढावा घेणारी वेबसिरीज तयार केली असून ती येत्या २ सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी त्याचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. पण हा ट्रेलर आता नेटफ्लिक्सवरुन काढून टाकण्यात आला आहे. ज्या फसव्या उद्योजकांवर आधारित ही वेबसिरीजवर आहे, त्या उद्योजकांनी वेबसिरीजच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला असून दिल्ली उच्च न्यायालयासह अन्य न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.

‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ या वेबसिरीजच्या रिलीजवर बिहारमधील स्थानिक अरारिया न्यायालयाने गेल्या आठवड्यात तात्पुरती स्थगिती दिली आहे. या न्यायालयात सहारा उद्योगाचे सर्वोसर्वा सुब्रतो रॉय यांनी वेबसिरीजच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती. तसेच दिल्ली उच्च न्यायालयात पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याने देखील याचिका दाखल करुन वेबसिरीज प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावी, अशी मागणी केली होती.

दरम्यान, या बिहारच्या स्थानिक न्यायालयाने आणलेल्या स्थिगितीविरोधात नेटफ्लिक्स पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. पण नेटफ्लिक्सने या ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकला आहे. पण तो युट्यूबर अद्यापही ठेवण्यात आला आहे.

चोक्सीचा भाचा आणि पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी, सहारा ग्रुपचा सुब्रतो रॉय, एसबीआयला ९ हजार कोटींचा चुना लाऊन फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा चेअरमन विजय माल्ल्या आणि सत्यम घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी रामलिंगा राजू यांचे फोटो नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेल्या या वेबसिरीजच्या पोस्टरमध्ये वापरण्यात आल्यामुळे ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे.