गुजरातमध्ये 1500 कोटी खर्चून उभारले जाणार जगातील सर्वात मोठे टॉय संग्रहालय


अहमदाबाद – अमेरिकेतील Branson, Missouri येथे सध्या जगातील सर्वात मोठे टॉय संग्रहालय असून त्याठिकाणी प्राचीनपासून आधुनिक काळातील १० लाखांपेक्षा जास्त खेळणी उपलब्ध आहेत. त्यानंतर आता आपल्या देशात त्याहून मोठे टॉय संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

जगातील सर्वात मोठे हे टॉय संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३० एकर जागा देण्यात आली असून गुजरातच्या बाल विद्यापीठाच्या बाल भवन प्रकल्पांतर्गत ते बांधले जाणार आहे. येथे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतची ११ लाखांपेक्षा जास्त खेळणी ठेवली जाणार आहेत. शास्त्रज्ञ, कलावंत, महापुरुषांची खेळण्यांद्वारे ओळख करणे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्याचा यामागे हेतू आहे. राज्याची राजधानी गांधीनगर येथील गिफ्ट सिटीजवळ शाहपूर आणि रतनपूर गावांच्या दरम्यान जगातील सर्वात मोठे हे टॉय संग्रहालय करण्याची तयारी आहे. सुमारे १५०० कोटी या बालभवनावर रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर ते तयार होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.

यासंदर्भातील वृत्त दैनिक भास्करने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार बाल विद्यापीठाचे कुलगुरू हर्षद शहा यांनी याबाबत माहिती देताना, या संग्रहालयाच्या बांधकामास येत्या दोन-तीन महिन्यांत प्रारंभ होईल. पंतप्रधान मोदींना भूमिपूजनासाठी निमंत्रित केले जाईल. पंतप्रधान स्वत: सक्रिय मार्गदर्शन करणार आहेत. २२ ऑगस्टला यासाठी पंतप्रधानांनी ऑनलाइन संवादही साधला. बाल विद्यापीठाला टॉय संग्रहालयाच्या प्रकल्पाशी संबंधित प्रेझेंटेशन सादर करायला त्यांनी सांगितले होते. त्याचबरोबर बाल विद्यापीठाच्या या योजनेत पूर्ण ताकदीने काम करण्याची सूचना त्यांनी केली.

या संग्रहालयाच्या माध्यमातून मुलांना शास्त्रज्ञ, कलाकार, महापुरुषांची ओळख आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाईल. त्याचबरोबर गगनयान, क्षेपणास्त्रे, ईव्हीएम यंत्र, १८५७ ची क्रांती इत्यादींची माहिती खेळण्यांच्या माध्यमातून सांगितली जाईल.
बाल विद्यापीठाचा गुजराती, हिंदी, इंग्रजीसह अनेक भारतीय भाषा शिकण्यासाठी अभ्यासक्रम असेल. डीआरडीओ, इस्रोच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक, बॅटरी, सोलार आधारित लहान यान, पृथ्वी-अग्नी क्षेपणास्त्र, उपग्रह आदींच्या प्रतिकृतीत खेळणी तयार केली जातील. खेळण्यांद्वारे बालमनाला शिक्षण संस्कार देण्याचे विचार लक्षात घेऊन बाल विद्यापीठ खेळणीशास्त्र विकसित करेल.