राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनकेंना कोरोनाची लागण


जुन्नर – राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातील लोकांना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराला देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. पुढील उपचारासाठी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

27 ऑगस्टला आमदार अतुल बेनके यांना त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेनके यांच्या स्वास्थ्यासाठी त्यांचे कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, यासंदर्भातील माहिती देताना अतुल बेनके यांनी केलेल्या ट्विटमध्ये 27 तारखेला त्रास जाणवू लागल्याने काळजी म्हणून कोरोना चाचणी केली. मात्र चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मागील काही दिवसांत ज्या व्यक्ती व सहकारी माझ्या संपर्कात आले, त्यांनी काळजी म्हणून स्वतःची चाचणी करावी.! आज मी स्वतः कोरोनाबाधित झालो असलो तरीही, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. हा लढा आपण जिंकणारच.! असा विश्वासदेखील बेनके यांनी व्यक्त केला आहे.